‘ती’ केवळ नावापुरतीच लोकप्रतिनिधी

Foto
औरंगाबाद :  राजकारणात महिलांचा सहभाग असावा की नसावा हा काही प्रश्‍नच होऊ शकत नाही. ‘संसद से पंचायत तक’ महिला प्रतिनिधी आहेत. आरक्षणाचा परिणाम आहे असे म्हटले तरी चालेल. त्यात चुकीचे असे काही नाही. सुखासुखी हक्‍क सोडायला कोणता पुरुष तयार होईल? ज्या महिला राजकारणात आल्या. स्थिरावल्या त्यांना ते वारसाहक्‍काने प्राप्त होऊ शकले हे सुद्धा नजरेआड करून चालणार नाही. पण बहुतांश महिला लोकप्रतिनिधी स्वतंत्रपणे, स्वतःच्या बुद्धीने राजकारण करू शकतात? निर्णय घेऊ शकतात? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र दुर्दैवाने नाही. असेच द्यावे लागते. औरंगाबाद शहरासारख्या महानगरातील महिला नगरसेवकांशी या संदर्भात ‘सांजवार्ता’ने संपर्क साधला असता मिळालेली माहिती धक्‍कादायक आहे. अर्थात हे उघड गुपीत सार्वजनिक करण्यासाठी ‘महिला दिन’ पेक्षा जास्त चांगला मुहूर्त दुसरा कोणता असणार?

औरंगाबाद मनपात सध्या 57 नगरसेविका आहेत. सर्वच नगरसेविकांशी संपर्क व्हावा, असा प्रयत्न होता. परंतु काही नगरसेवकांशी संपर्क होऊ शकला नाही, कारण त्यांच्या नावाने असलेले दूरध्वनी क्रमांक बंद होते. 30 ते 35 नगरसेविका स्वतः  काम पाहत नाहीत. 11 नगरसेविका मात्र स्वतंत्रपणे का करीत असल्याचे दिसल्या. परंतु काहींचे फोन बंद होते, तर काहींचे पतींकडे. त्यांनी नगरसेविका फोन करेल असे सांगितले, मात्र  फोन आले नाहीत. तर काहींचे मोबाईल पी. ए कडे होते.  या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट स्पष्ट झाली की ’ महिलाराज ’  हे नावालाच उरलेले आहे. या नगरसेविकांच्या वॉर्डात विकास कामे झालीच नाहीत असे नाही.

अनेक ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कामे झाली आहेत. मात्र या कामात या महिलांचा वाटा म्हणाल तर आनंदच आहे. अनेक नगरसेविका पतींनी तर महिलांसाठी वॉर्ड आरक्षित असल्यानेच आम्हाला नाईलाजाने त्यांना उभे करावे, लागल्याचे बिनदिक्कत सांगून टाकले. 

सत्यभामा शिंदे  : ठाकरे नगरच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे या आहेत. परंतु सर्व कामकाज त्यांचे पती दामुअण्णा शिंदेच पाहतात. त्यांच्याशी बातमी संदर्भात दूरध्वनीवरून संपर्क केल्यास जे काही कामे असेल ते मलाच सांगा मी हे सर्व कामकाज पाहतो, असे त्यांनी सांगितले.या भागातील रहिवासी सांजवार्ता शी बोलतांना म्हणाले, आमच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे आहेत कि दामुअण्णा हे कित्येक जणांना माहीत नाही, कारण त्या स्वतः कधीही दिसत नाहीत. त्यांच्या वतीने सर्व कामांमध्ये त्यांचे पतीच लक्ष देतात.

मनिषा मुंढे : जय भवानी नगरच्या  नगरसेविका मनिषा मुंढे या आहेत. यांचे देखील सर्व कामकाज पती बालाजी मुंढे पाहत असतात.त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्यास त्यांच्या पतींनीच फोन घेतला, काय काम आहे ते मला सांगू शकतात, असे ते म्हणाले.मॅडम शी बोलायचे असल्याचे सांगताच घरी गेल्यावर फोन करायला सांगतो, म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. परंतु मनपाच्या कागदोपत्री संबंधित फोन नंबर हा मनिषा मुंढे यांच्या नावाने आहे, हे महत्त्वाचे.

बबिता चावरीया -  औरंगपुरा भागाच्या नगरसेविका बबिता चावरीया आहेत परंतु कारभार त्यांचे दिर अजय चावरीया पाहतात. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्यास कागदोपत्री बबितांच्या नावाने असलेला नंबर अजय यांच्याकडे असल्याचे निदर्शनास आले, व सांजवार्ता शी बोलतांना ते म्हणाले ’ मीच सर्व कामकाज पाहतो, बोला’ यावरुन एकंदरीत प्रकार समजला.

 रेश्मा कुरैशी - समता नगर - कोटला कॉलनीच्या नगरसेविका रेश्मा कुरैशी आहेत, परंतु सर्व कामकाज पती अश्पाक कुरैशी पाहत असतात. अधिकृतपणे फोन नंबर रेश्मा कुरैशी यांचा असायला हवा तोदेखील त्यांच्या पतीचा आहे. सर्व काम तुम्हीच पाहतात का? यावर हो मीच पाहतो मला बोलु शकता जे काही असेल ते असे उत्तर त्यांनी दिले.

ज्योती मोरे - बाळकृष्ण नगर, शिवनेरी कॉलनीच्या नगरसेविका ज्योती मोरे आहेत. त्यांच्या नावाने  असलेल्या अधिकृत फोन नंबर नेहमी त्यांचे पतीच बोलतात. ज्योती मोरे यांच्याकडे फोन द्या असे म्हणताच माझ्याशीच बोला ,त्या बोलणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

 सलीमा कुरैशी - प्रियदर्शिनी नगरच्या नगरसेविका सलीमा कुरैशी आहेत, यांचे काम देखील त्यांचे पती बाबू भाई कुरैशी पाहतात. ’ मैहिच  उनका सब काम देखता हू , असे त्यांनी सांजवार्ता शी बोलतांना सांगितले.

शोभा बुरांडे -  देवानगरीच्या नगरसेविका शोभा बुरांडे आहेत परंतु त्यांनी बोलण्यास नकार देत माझा मुलगा प्रदिप बुरांडे काम पाहतो त्यालाच फोन करा असे, सांगितले.

मुल्ला सलीमा बेगम - हमालवाडा रेल्वेस्टेशनच्या नगरसेविका मुल्ला सलिमा बेगम यांचा अधिकृत फोन नंबर त्यांच्या पतीकडेच होता त्या नंतर बोलतील असे सांगितले गेले.

सुमित्रा हाळनोर -  ज्योती नगरच्या नगरसेविका सुमित्रा हाळनोर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचे पती गिरिजाराम हाळनोरच बोलले. आम्ही मिळून कामकाज पाहत असल्याचे ते म्हणाले परंतु मॅडम फोन घेत नाही हे देखील त्यांनी सांगितले.

अर्चना निळकंठ - विश्वभारती कॉलनीत अर्चना निळकंठ नगरसेविका आहेत, परंतु त्यांचे काम दिर सागर निळकंठ पाहतात. अधिकृतपणे अर्चना यांच्या नावाने असलेला  नंबर सागर निळकंठ यांच्या कडेच आहे. त्यांच्याशी याविषयी सांजवार्ता प्रतिनिधीने संपर्क साधल्यावर ते म्हणाले निवडणूका झाल्या, त्यावेळी महिला वॉर्ड असल्याने आमचा नाईलाज होता. असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

सीमा चक्र नारायण -  रामकृष्ण नगरच्या नगरसेविका सीमा चक्र नारायण यांचा अधिकृत नंबर मुलाकडे होता तसेच त्यांचे काम पती पाहतात असे त्यांच्या मुलाने सांगितले.

 ज्योती नाडे -  नगरसेविका ज्योती नाडे आहेत त्यांचे कामकाज देखील पती सुनिल नाडे पाहतात.

 अनिता साळवे - राज नगर, मुकुंदवाडीच्या नगरसेविका अनिता साळवे आहेत. त्यांचे सर्व  काम पती मोहन साळवे पाहतात.

विजया बनकर - रमानगरच्या नगरसेविका विजया बनकर आहेत. त्यांचे संपूर्ण कामकाज सासरे नंदकिशोर बनकर पाहतात

 शितल गादगे - ,एन- सहाच्या नगरसेविका असलेल्या शितल गादगे या देखील नाममात्रच नगरसेविका आहेत. त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांचे पती वीरभद्र गादगे यांनी सांगितले,’काय माहिती लागते ती मी देतो, कामकाज मीच पाहतो, मी देखील शिवसेनेचा माजी नगरसेवक आहे.असे त्यांनी सांगितले.

आशा भालेराव -  नगरसेविका आशा भालेराव यांचे कामकाज पती नरेश भालेराव पाहतात. त्यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली.

यशश्री बाखरीया -  नगरसेविका असलेल्या यशश्री बाखरीया या सर्वात तरुण नगरसेविका आहेत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांचे वडील लक्ष्मीनारायण बाखरीया यांनीच फोन उचलला. याठिकाणी देखील मुलीचे कामकाज  वडिलच पाहतात.

सीमा खरात -  स्वामी विवेकानंद नगरच्या नगरसेविका सीमा खरात आहेत त्यांते कामकाज त्यांची मुलगी व मुलगा पाहतात.

शोभा वळसे -  श्री कृष्णनगरच्या नगरसेविका शोभा वळसे आहेत. त्यांच्या नावाने असलेला अधिकृत नंबर त्यांचे दिर अशोक वळसे यांच्याकडे असतो, व सर्व कामकाज देखील तेच पाहत असल्याचे त्यांच्याशी झालेल्या बातचीतवरुन समजते.

 भारती सोनवणे -  आंबेडकर नगरच्या नगरसेविका भारती सोनवणे आहेत, परंतु त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे पी. ए विजय धूळसनेंनीच फोन घेतला. व त्यांचे कामकाज पी. ए च पाहतात हे झालेल्या संभाषणातून समजते. तसेच त्यांचे पती महेंद्र सोनवणे त्यांचे संपूर्ण काम अधिकृतपणे पाहतात. संपर्क कार्यालयातही भारती सोनवणे कधीही दिसत नाही.

वैशाली जाधव - चौधरी कॉलनी , चिकलठाण्याच्या नगरसेविका वैशाली जाधव आहेत. त्यांच्या नावाने असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर फोन ड्रायव्हरने उचलला व त्यांच्याशी झालेल्या बातचीतवरुन पी. ए आकाश खोटकर कामकाज पाहतात असे म्हणत त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक  सांजवार्ता प्रतिनिधीला दिला. स्वत: वैशाली जाधव यांनी देखील सांजवार्ता प्रतिनिधीशी बोलतांना पी. ए काम पाहत असल्याचे सांगितले.

 मनिषा लोखंडे -  भावसिंगपुर्‍याचा नगरसेविका असलेल्या मनिषा लोखंडे यांचे सर्व कामकाज त्यांचे दिर गणेश लोखंडे पाहतात.

शकीला बेगम - बुढीलाईन, कबाडीपुर्‍याच्या नगरसेविका शकीला बेगम आहेत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा मुलगा मोहम्मद यांनी सांगितले कि मीच सर्व कामकाज पाहतो जे काही असेल ते बोलु शकतात. 


           तुम्ही जे म्हणताय ते खरे आहे अगदी सर्वच महिला स्वत:ची कामे स्वत: करत नाही, यामागे पुरुषी मानसिकता जबाबदार आहे .आरक्षण असल्यामुळे आई, बायको, बहिण यांना प्राधान्य दिले जाते.यात आता एकच म्हणेल या गोष्टींना नकारात्मकतेने पाहू नये, पाच वर्षाची पाहुणी आली आणि गेली असे होऊ नये, स्वत: शिकत तिने स्वत: राजकारण करावे. यात तिचा दोष नसतोच मुळी कोणाच्या तरी जागेवर तिला उभे केलेले असते, आता नवर्‍याने, घरातल्यांनीच तिला संधी द्यायला हवी.आम्ही आमच्या पक्षातील महिलांना नेहमी सांगत असतोकी कशाप्रकारे त्यांनी एकट्याने काम करावे, त्यांना आम्ही जबाबदारीचे कामे देऊन संधी उपलब्ध करून देत असतो.
                                                                                    विजया रहाटकर , माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष